Namo Shetkari Yojana Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मकर संक्रांतीनंतर एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. वाढती महागाई, उत्पादन खर्च, हवामानातील बदल आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना पुन्हा एकदा आधार देणारी ठरणार आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आठव्या हप्त्याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले असून, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नमो शेतकरी योजना नेमकी काय आहे?
शिंदे सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राबवली जाते. या योजनेत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आत्तापर्यंत या योजनेचे सात हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आले असून, लाखो शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा झाला आहे.
आठव्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर
पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता. साधारणपणे पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर १५ ते २० दिवसांत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होतो. मात्र यावेळी थोडा विलंब झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजेच ५ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार लाभ
राज्यातील तब्बल ९१ लाख ९७ हजार पात्र शेतकरी या हप्त्याचे लाभार्थी असणार आहेत. यासाठी राज्य सरकारकडून १,९३० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. निधीला मंजुरी मिळाल्यानंतर हप्ता वितरणाचा मार्ग मोकळा होणार आहे. Namo Shetkari Yojana Update
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हप्ता लवकर?
महत्त्वाचे म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता निवडणुकीपूर्वीच वितरित करू शकते, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या तरी सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र राजकीय आणि प्रशासकीय हालचाली पाहता फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात पैसे खात्यात जमा होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मदत
पेरणीपूर्व तयारी, खत-बियाण्यांचा खर्च आणि घरगुती गरजा भागवण्यासाठी ही रक्कम शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग आता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याकडे आशेने पाहत आहे. अधिकृत घोषणा होताच आम्ही सर्वात आधी तुम्हाला अपडेट देऊ. त्यामुळे अशाच महत्त्वाच्या शेतकरी बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.