Ladki Bahin Yojana January Installment | राज्यात सध्या निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. कालच २९ महापालिकांसाठी मतदान पार पडलं असून आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. पण हे राजकारण एका बाजूला असतानाच, सामान्य माणसासाठी मात्र एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मकर संक्रांतीच्या गोडव्यासोबतच राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा केले होते, मात्र आता चर्चा आहे ती म्हणजे पुढच्या धमाक्याची!
येत्या ५ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. याच मतदानाचा दिवस उजाडण्यापूर्वीच राज्यातील लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना सरकारकडून मोठी ओवाळणी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचा जानेवारी महिन्याचा हप्ता ५ फेब्रुवारीच्या आतच मिळणार आहे. म्हणजे महिना संपताच पुन्हा एकदा खात्यात दीड हजार रुपये जमा होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यातही पडणार २ हजार रुपये
केवळ लाडक्या बहिणीच नाही, तर आपला बळीराजाही आता सुखावणारे आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांना २ हजार रुपये वितरित करण्याची तयारी सरकारने पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे १९३० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असून त्याचा प्रस्तावही सादर झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष
या निर्णयाचा मोठा फायदा सोलापूर जिल्ह्यातील जनतेला होणार आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यात साडेनऊ लाख लाडक्या बहिणी आणि सव्वा पाच लाख शेतकरी आहेत. या सर्वांच्या खात्यात मतदानापूर्वी पैसे जमा करून सरकार आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. राज्यातील एकूण ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरीचे पैसे जमा होणार आहेत.
निवडणुकीच्या काळात अशा निर्णयांकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जात असले, तरी ऐन महागाईच्या काळात घरखर्चाला हातभार लावणाऱ्या लाडक्या बहिणी आणि पेरणी-कापणीच्या खर्चासाठी पैशांची वाट पाहणारा शेतकरी मात्र या निर्णयामुळे सुखावला आहे. आता अर्थ विभागाची मंजुरी मिळताच पुढच्या काही दिवसात मोबाईलवर ‘क्रेडिट’चा मेसेज धडकणार, हे नक्की!