Cotton Market News : गेल्या दोन-तीन वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकरी ज्या भावाची वाट पाहत होते, तो क्षण आता हळूहळू जवळ येतोय. सतत खर्च वाढत चालला, पण कापसाला भाव मिळत नव्हता. बियाणं, खत, औषध, मजुरी सगळं महाग झालं, आणि बाजारात गेल्यावर दर मात्र शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते. पण आता हंगामाच्या मध्यातच कापूस बाजारातून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कापसाचे दर पहिल्यांदाच विक्रमी पातळीवर पोहोचले असून ‘पांढऱ्या सोन्याची’ वाटचाल थेट 9 हजार रुपयांकडे सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे. Cotton Market News
सध्या बाजारात जे चित्र आहे, त्यामागे दोन महत्त्वाची कारणं ठरत आहेत. एक म्हणजे कापूस आयातीवर पुन्हा लागू झालेलं शुल्क आणि दुसरं म्हणजे सरकीच्या दरात झालेली वाढ. एक जानेवारीपासून कापूस आयातीवरील शुल्क पुन्हा लागू करण्यात आलं आहे. याआधी 11 टक्के आयात शुल्क माफ केल्यामुळे परदेशी कापूस मोठ्या प्रमाणात देशात येत होता. त्याचा थेट फटका देशांतर्गत बाजाराला बसला आणि शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळत नव्हता. आता मात्र परिस्थिती बदलू लागली आहे. आयात कमी होताच देशांतर्गत कापसाला मागणी वाढली आहे.
याच काळात सरकीचे दरही वाढू लागले आहेत. सरकीला चांगला भाव मिळत असल्यामुळे कापूस खरेदी करणारे व्यापारी जास्त दर द्यायला तयार होत आहेत. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळताना दिसतोय. सध्या कापसाचे दर 8,450 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले असून काही ठिकाणी याहूनही चांगले दर मिळाल्याची माहिती आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत या हंगामातील आतापर्यंतचे सर्वाधिक दर मिळाल्यामुळे संपूर्ण कापूस पट्ट्यात चर्चा सुरू आहे. बुधवारी झालेल्या लिलावात अमरावती बाजारात कापसाला 8,100 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. विशेष म्हणजे तब्बल 38 टक्के झडती असलेला कापूसही थेट 8,450 रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला. ही बाब शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे कारण झडती जास्त असतानाही इतका दर मिळणं याआधी कधीच पाहायला मिळालं नव्हतं.
काही दिवसांपासून बाजारात भाव वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकरी आणि व्यापारी कापूस साठवून ठेवत आहेत. त्यामुळे बाजारात आवक कमी झाली आहे. अमरावतीतील सीसीआय खरेदी केंद्रावर याआधी दररोज सहा ते सात हजार क्विंटल कापसाची आवक होत होती पण आता खुल्या बाजारात दर वाढल्यानंतर ही आवक थेट 500 ते 1000 क्विंटलपर्यंत खाली आली आहे. बाजारात माल कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती तयार होत असल्याने दरांना आणखी बळ मिळत आहे.
जवळपास दोन वर्षांपासून कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले होते. काहींनी तर पुढील हंगामात कापूस घ्यायचा की नाही, असा विचार सुरू केला होता. मात्र सध्याची दरवाढ पाहता पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाली आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं असून यंदा तरी नुकसान भरून निघेल अशी भावना गावागावात बोलली जात आहे.
येत्या काळात जर हीच परिस्थिती कायम राहिली, आयात कमीच राहिली आणि सरकीचे दर मजबूत राहिले, तर कापूस बाजारभाव 9 हजार रुपयांचा टप्पा गाठणं अशक्य नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे आता शेतकरीही बाजारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पुढील काही आठवडे कापूस उत्पादकांसाठी निर्णायक ठरणार असून पांढऱ्या सोन्याची ही वाटचाल कुठवर जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे पण वाचा : पांढर सोन्याच्या दरामध्ये झाली तुफान वाढ! सध्या इतका मिळतोय दर