Ladki Bahin Yojana 3000 Deposit | राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ तारखेला निकाल स्पष्ट होणार आहे. पण या सगळ्यात चर्चा रंगली आहे ती म्हणजे ‘लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्याची!
खरं तर, सरकारने १४ जानेवारीला म्हणजेच संक्रांतीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये जमा करण्याची तयारी केली आहे. सण साजरा करण्यासाठी ही एक मोठी मदत ठरणार होती. पण आता या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निवडणूक आयोगाचा पेच काय?
नियम सांगतो की, मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांवर प्रभाव टाकेल असं कोणतंही पाऊल सरकारला उचलता येत नाही. १४ जानेवारीला पैसे दिले आणि १५ तारखेला मतदान असेल, तर निवडणूक आयोग यावर आक्षेप घेऊ शकतो. आचारसंहितेच्या कचाट्यात हा निर्णय अडकला, तर लाडक्या बहिणींना पैशांसाठी वाट पाहावी लागू शकते.
काय म्हणाले अजित पवार?
महिलांच्या मनात असलेला हा गोंधळ दूर करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की, “जर निवडणूक आयोगाने सूचना दिल्या किंवा आक्षेप घेतला, तर आम्हाला हा हप्ता पुढे ढकलावा लागेल.” याचा अर्थ असा की, सर्व काही आता निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून आहे. जर आयोगाने हिरवा कंदील दाखवला, तरच १४ तारखेला बँक खात्यात ‘मेसेज’ येईल. अन्यथा, निवडणुका पार पडल्यानंतरच हे पैसे मिळतील.
बहिणींची धाकधूक वाढली!
ऐन सणासुदीच्या काळात खात्यात पैसे येतील या आशेवर असलेल्या हजारो महिलांच्या नजरा आता आयोगाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. निवडणुकीच्या या धामधुमीत राजकारण एका बाजूला आणि सर्वसामान्यांचे आर्थिक गणित दुसऱ्या बाजूला, अशी परिस्थिती सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.