Labour Ministry EPFO New Rules | नोकरी करणाऱ्या प्रत्येक माणसासाठी त्याचा ‘पीएफ’ (EPF) हा कष्टाचा आणि हक्काचा पैसा असतो. पण गरज पडली की हाच पैसा काढताना होणारी धावपळ, तो फॉर्म भरणं आणि पैशांची वाट पाहणं यात जीव मेटाकुटीला येतो. जर मी तुम्हाला सांगितलं की, आता तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढणं हे गुगल पे किंवा फोन पे वरून पैसे पाठवण्याइतकंच सोपं होणार आहे, तर?
हो, तुम्ही बरोबर ऐकलंत! कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO आता कात टाकतेय. येत्या एप्रिल २०२६ पासून तुमच्या पीएफ खात्याला थेट UPI ची जोड मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच, आता पीएफ ऑफिसच्या चकरा मारण्याचे दिवस संपले असं समजायला हरकत नाही.
नेमकं काय आहे हे नवीन ‘UPI’ गणित?
कामगार मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार एका अशा प्रणालीवर काम करतंय जिथे तुमचं पीएफ खातं एखाद्या बँक खात्यासारखं काम करेल. यातली सर्वात भारी गोष्ट म्हणजे, तुम्हाला तुमच्या एकूण शिलकीपैकी जवळपास ७५% रक्कम यूपीआयद्वारे कधीही काढता येईल. फक्त निवृत्तीनंतरची सोय म्हणून तुमची २५% रक्कम ‘फ्रीज’ म्हणजेच लॉक करून ठेवली जाईल, जेणेकरून म्हातारपणाची काठी सुरक्षित राहील.
घरबसल्या, चुटकीसरशी पैसे खात्यात!
आतापर्यंत पीएफचे पैसे मिळायला आठवडा-पंधरा दिवस लागायचे. पण नवीन ‘ऑटो-सेटलमेंट’मुळे आता फक्त ३ दिवसांत क्लेम निकाली निघणार आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी ही मर्यादा १ लाखापर्यंत होती, ती आता थेट ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आजारपण असो, मुलांचं शिक्षण असो वा लग्नकार्य… आता ऐनवेळी कोणाकडे हात पसरण्याची गरज उरणार नाही. तुमचा पीएफ तुमच्यासाठी एटीएमसारखा धावून येईल.
नियम झाले सोपे, टेन्शन झालं कमी
आधी पीएफ काढण्याचे १३ गुंतागुंतीचे नियम होते, जे वाचतानाच डोकं चक्रावून जायचं. सरकारने आता ही अडथळ्यांची शर्यत संपवून फक्त ३ सोप्या श्रेणी केल्या आहेत:
१. तातडीच्या गरजा (आजारपण, शिक्षण, लग्न)
२. घरासाठी लागणारा पैसा
३. विशेष परिस्थिती
यामुळे बहुतेक कामांसाठी तुम्हाला कागदपत्रांची साठमारी करण्याचीही गरज भासणार नाही. ८.२५% व्याजाचा फायदा तर मिळतच राहील, शिवाय पैसा हाताशी असण्याचं स्वातंत्र्यही मिळेल.