Inspirational Love Stories 2026 | असं म्हणतात की, पहिलं प्रेम हे माणसाच्या काळजाच्या एका कोपऱ्यात शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत असतं. काळ बदलतो, माणसं बदलतात आणि परिस्थिती सुद्धा बदलत राहते, पण त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत. प्रेम करणं जितकं सोपं असतं, तितकंच ते निभावणं आणि आवडीच्या माणसासोबत आयुष्य घालवणं कठीण असतं. जगात अशा हजारो प्रेमकथा आहेत ज्या अर्धवट राहिल्या, कारण नशिबाने त्यांना साथ दिली नाही. पण आता याच नशिबाला आव्हान देत एका जोडप्याने चक्क ४० वर्षांनंतर आपलं अपूर्ण प्रेम पूर्ण केलं आहे. ही गोष्ट ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
काळीज हेलावणारी जुनी आठवण
ही अनोखी कहाणी आहे केरळच्या मुंडक्कल येथील जयप्रकाश आणि रश्मी यांची. आज सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. या कथेची सुरुवात झाली होती साधारण ४०-४५ वर्षांपूर्वी. जेव्हा जयप्रकाश आणि रश्मी तरुण होते, तेव्हा त्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमाची भावना होती. जयप्रकाश यांचं रश्मीवर जीवापाड प्रेम होतं, पण आपल्या मनातली गोष्ट ओठावर आणण्याचं धाडस त्यांना कधी जमलं नाही. मन मारून दोघंही गप्प राहिले आणि बघता बघता नशिबाने त्यांना दोन वेगळ्या वाटांवर नेऊन सोडलं.
काळाचा महिमा आणि पुन्हा झालेली भेट
नशिबाचा खेळ बघा, रश्मी यांचं लग्न झालं आणि जयप्रकाश नोकरीच्या निमित्ताने परदेशात निघून गेले. दोघांनीही आपापली संसार थाटले, मुलंबाळं झाली आणि आयुष्य पुढे सरकत राहिलं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. सुमारे १० वर्षांपूर्वी रश्मी यांच्या पतीचं निधन झालं, तर ५ वर्षांपूर्वी जयप्रकाश यांच्या पत्नीनेही जगाचा निरोप घेतला. दोघंही आयुष्याच्या संध्याकाळी अगदी एकाकी पडले होते. हा एकाकीपणा दूर करण्यासाठी रश्मी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि शॉर्ट फिल्म्समध्ये काम करायला सुरुवात केली आणि याच प्रवासात ४० वर्षांनंतर हे ‘जुने प्रेमी’ पुन्हा एकदा समोरासमोर आले.
४० वर्षांनंतर साता जन्माची गाठ
जेव्हा पुन्हा भेट झाली, तेव्हा मनातल्या त्या जुन्या भावना पुन्हा एकदा जाग्या झाल्या. जे शब्द ४० वर्षांपूर्वी सांगता आले नव्हते, ते आता वयाच्या साठीत व्यक्त झाले. ‘आता तरी सोबत राहूया’ असा विचार करून या दोघांनीही लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबाजीही साथ लाभली. अखेर ४० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जयप्रकाश आणि रश्मी यांनी लग्नगाठ बांधली.