Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा ₹१५०० चा हप्ता आजपासून थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मकरसंक्रांतीआधी पैसे येतील, असे संकेत सरकारकडून देण्यात आले होते आणि अखेर त्या आशेला काही अंशी तरी पूर्णविराम मिळाला आहे. अनेक महिलांच्या खात्यात आज सकाळपासूनच पैसे जमा झाल्याचे दिसून येत असून ग्रामीण आणि शहरी भागातून आनंदाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आर्थिक आधार देणारी महत्वाची योजना ठरली आहे. घरखर्च, औषधोपचार, मुलांचे शिक्षण किंवा छोट्या गरजा भागवण्यासाठी या ₹१५०० चा हप्ता अनेक कुटुंबांसाठी महत्वाचा ठरतो. त्यामुळे मकरसंक्रांतीसारख्या सणाच्या आधीच पैसे खात्यात जमा झाल्याने महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सरकारकडून यापूर्वी मकरसंक्रांतीला ₹३००० एकत्र येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र सध्या फक्त डिसेंबर महिन्याचा एकच हप्ता जमा झाल्याने काही महिलांमध्ये नाराजीही दिसून येत आहे.
आजपासून बहुतांश लाभार्थी महिलांच्या खात्यात ₹१५०० जमा होत असून उद्यापर्यंत सर्व पात्र महिलांना हा हप्ता मिळेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. काही महिलांना अद्याप पैसे मिळाले नसले तरी घाबरण्याचे कारण नाही. हप्ते टप्प्याटप्प्याने जमा केले जात असल्याने थोडा वेळ लागू शकतो. पैसे जमा झाल्यानंतर बँकेकडून एसएमएस येतो. याशिवाय मोबाईल बँकिंग अॅप, एटीएम मिनी स्टेटमेंट किंवा थेट बँकेत जाऊन खात्याची तपासणी करता येते. Ladki Bahin Yojana
दरम्यान, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका घेतली असून एकाच वेळी दोन महिन्यांचे पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सध्या महिलांना फक्त डिसेंबर महिन्याचाच ₹१५०० चा हप्ता देण्यात आला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता महापालिका निवडणुकीनंतरच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकीकडे अपेक्षेपेक्षा कमी रक्कम मिळाल्याने थोडी निराशा असली, तरी किमान मकरसंक्रांतीआधी पैसे खात्यात आले याचे समाधान अनेक महिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. वाढती महागाई, दैनंदिन खर्च आणि घरगुती अडचणींमध्ये ही रक्कम महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे. आता सर्वांचे लक्ष जानेवारीच्या हप्त्याकडे लागले असून सरकार पुढील रक्कम कधी जमा करणार, याकडे लाडक्या बहिणी उत्सुकतेने पाहत आहेत.