Ladki Bahin Yojana Update : राज्यातील लाखो महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही केवळ सरकारी योजना न राहता महिन्याच्या खर्चाला हातभार लावणारी मोठी आधाराची कडी बनली आहे. त्यामुळेच मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारीचा मिळून ₹३००० चा हप्ता खात्यात जमा होणार, अशा चर्चांनी जोर धरला होता. मात्र, ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवताच या योजनेभोवती पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आणि “खरंच पैसे येणार का?” असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला.
काँग्रेसने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात लाडकी बहीण योजनेला थेट विरोध नसल्याचं स्पष्ट करत, महापालिका निवडणुका संपल्यानंतरच या योजनेचा हप्ता वितरित करावा, अशी मागणी केली आहे. आचारसंहिता लागू असताना मोठ्या प्रमाणावर रक्कम वाटप झाल्यास त्याचा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर १४ जानेवारीपूर्वी म्हणजेच मकरसंक्रांतीला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील की नाही, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. Ladki Bahin Yojana Update
या सगळ्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत एकप्रकारे विषयावर पडदा टाकला आहे. लाडकी बहीण योजना ही सुरू असलेली योजना असून आचारसंहितेनुसार सुरू असलेल्या कोणत्याही योजनेला थांबवता येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. “कोणी कितीही पत्र लिहिली, कितीही विरोध केला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. महिलांना पैसे मिळणारच,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांनी यापूर्वीही ही योजना बंद करण्याची मागणी केली होती, न्यायालयात गेले होते, पण सरकारने ही योजना थांबवली नाही, असंही फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं.
मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेनंतर लाभार्थी महिलांमध्ये पुन्हा एकदा दिलासा निर्माण झाला आहे. फडणवीसांच्या विधानावरून पाहता, महापालिका निवडणुकीआधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता अधिक आहे. मकरसंक्रांतीच्या सणात हा हप्ता मिळाल्यास घरखर्च, मुलांचे शिक्षण, दैनंदिन गरजा यासाठी महिलांना मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे सध्या तरी लाडकी बहीण योजना थांबणार नाही, आणि सरकार आपल्या शब्दावर ठाम आहे, हेच या घडामोडींमधून स्पष्ट होत आहे.