Maharashtra Railway News: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील लाखो नागरिकांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. तब्बल तीन दशकांपासून चर्चेत असलेला मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्प अखेर प्रत्यक्ष मार्गावर आला आहे. अनेक वर्षे फक्त कागदावर अडकून पडलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरू लागला असून, काही ठिकाणी रेल्वे रुळ टाकण्याचं कामही सुरू झालं आहे. या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गामुळे उत्तर महाराष्ट्र, खानदेश आणि मध्य प्रदेशातील दळणवळणाचा नकाशाच बदलणार आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये सध्या समाधान आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
तीन दशकांचा संघर्ष अखेर फळाला
मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी सन १९९२ पासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या प्रकल्पाला मान्यता मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू होत नसल्याने अनेकदा नागरिकांमध्ये नाराजी होती. तांत्रिक अडचणी, निधीचा अभाव आणि दोन राज्यांमधील समन्वयाचा प्रश्न यामुळे हा मार्ग कधी गुंडाळला जाणार की काय, अशी भीतीही व्यक्त केली जात होती. Breaking News | प्रकल्प रखडल्याने संघर्ष समितीने थेट इंदूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर अनेक वेळा डीपीआर (तपशीलवार प्रकल्प अहवाल) आणि अंतिम सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आले.
खर्च वाढत गेला, काम मात्र थांबलेच
सन २००९ मध्ये या रेल्वे प्रकल्पाचा अंदाजे खर्च १ हजार कोटी रुपये इतका होता. पुढे तो वाढून १,५०० कोटी रुपये झाला. त्या वेळी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारकडून हिस्सा देण्याची अट होती. महाराष्ट्र सरकारने आपला निधी दिला, मात्र मध्य प्रदेशकडून अपेक्षित निधी न आल्याने काम पुन्हा थांबले. काळ जसजसा पुढे गेला, तसतसा प्रकल्पाचा खर्च वाढत गेला आणि तो थेट ८ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. इतकंच नव्हे, तर संपूर्ण प्रकल्प अहवालास मान्यता मिळूनही आर्थिक मंजुरीअभावी प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नाही.
लोकप्रतिनिधी आणि संघर्ष समितीचा निर्णायक हस्तक्षेप
या प्रकल्पासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, माजी आमदार अनिल गोटे, खासदार गजेंद्र पटेल, खासदार शंकर लालवानी, राज्यसभा खासदार सुमेर सोलंकी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान, संघर्ष समितीचे प्रमुख मनोज मराठे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रे सादर केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर या प्रकल्पाला तब्बल १८ हजार कोटी रुपयांची संपूर्ण आर्थिक मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली.
प्रत्यक्ष कामाला सुरुवात, रुळ टाकण्याचं काम सुरू
सध्या मनमाड ते इंदूर दरम्यान जमीन संपादन आणि बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर परिसरात सुमारे १२० मीटरपर्यंत प्रत्यक्ष रेल्वे रुळ टाकण्याचं काम पूर्ण झालं आहे. ही बाब प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, उर्वरित जमिनीचे संपादन पूर्ण झाल्यानंतर या रेल्वे मार्गाचं काम आणखी वेग घेणार आहे. Maharashtra Railway News
उत्तर महाराष्ट्रासाठी विकासाचा नवा ट्रॅक
मनमाड–इंदूर रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर व्यापार, उद्योग, शेती आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यातील अंतर कमी होणार असून, प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात येत असल्याने, हा फक्त रेल्वे मार्ग नसून सामान्य जनतेच्या संघर्षाचा आणि संयमाचा विजय असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.